माय राजापूर

राजापूर :-

कोकणातील राजापूर शहर हे विजयनगरच्या साम्राज्याच्या पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. इ. स. १६ व्या शतकापासून दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध व्यापारी बंदर म्हणून नावारूपास आलेले व १८ व्या शतकात भरभराटीला येऊन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यापारी बंदर म्हणून ख्याती होऊन जगभरात ‘राजापूरची गढी’ म्हणून नवलौकिक प्राप्त केलेले आहे.
चारही बाजूला डोंगर व मध्ये वसलेले राजापूर शहर हे आधुनिक युगात राजापूर व्हँली आहे.
‘विविधतेतून एकता’ हे राजापूरला अचूक लागू होते. राजापूरात हिंदू, मुस्लिम, बौध्द्, जैन धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. प्रत्येक धर्माप्रमाणे आपले सण आनंदाने साजरे करतात. गणपती उत्सव, दिवाळी, शिमगा (होळी) हे हिंदूचे मोठे सण.
रमजान ईद, ईद-ए-मिलाद, बकरी ईद हे मुस्लिमांचे सण, बौध्द जयंती, आंबेडकर जयंती हे बौध्द धर्माचे सण उत्साहात साजरे होतात.
कलात्मक व जागृत पुरातन मंदीरे, आकर्षक मशिदी, शिवकालीन इंग्रज वखार व पुल, पेशवेकालीन वास्तु, जांभ्या दगडातील कौलारू घरे अशा वैविध्यपूर्ण वास्तूंनी राजापूर नटलेले आहे.
उपजिविकेसाठी बहुतांशी लोक शेतीवर अवलंबून असतात. पावसाळ्यात भात, भाजीपाला ही पिके घेतली जातात. वर्षभर सिंचन व्यवस्था आहे तेथे माड, पोफळी यांच्या बागा आहेत. स्थानिक भाषेत त्याला ‘आगर’ म्हणतात. आंबा व काजू बागा हे राजापूरचे वैशिष्ट्य आहे. आंबा, काजू, माड, पोफळीची लागवड करून निसर्गसौंदयात वाढ करण्याचे मोठे काम इथले शेतकरी करीत असतात.
समुद्र किनार्‍यानवरील लोक मासेमारी करून आपली उपजिविका करतात व मासेमारीसाठी लागणार्‍या होड्या, लाँच तयार करणे, दुरुस्ती करणे, जाळी विणणे व इतर पूरक व्यवसायही उपजिविकेसाठी करतात. समुद्रकिनारी पर्यटन हा उद्योग भविष्यात मोठा रोजगार देणारा व्यवसाय होऊ शकतो.
मार्च ते मे मध्ये ओल्या काजूची उसळ, कैरीची चटणी, लोणचे, फणसाच्या गर्‍याची भाजी ह्या पदार्थांची स्थानिकांच्या जेवणात रेलचेल असते. हापूस आंबे, काजूगर, तळलेले गरे, फणसाची व आंब्याची साठे, कोकम सरबत, आवळा सरबत हे पदार्थ विक्रीसाठी त्यावेळी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.
लक्ष्मी केशव औषध शाळेतील आयुर्वेदिक उत्पादन, सर्वोत्तमची वेगवेगळी सरबते यांना फार चांगली मागणी असते. ठाकूर यांच्या ‘आझाद' बेकरीतील खारी, मकरूम, अफलातून या उत्पादकांना स्थानिक व पर्यटकांकडून खूप मागणी असते.
राजापूर खूप विस्तारलेले आहे,वैविध्यपूर्ण आहे. आधुनिक विकासाची बाधा न झालेलं नैसर्गिक सौंदर्य, स्वच्छ हवा शाबूत असलेलं राजापूर तालुका निसर्गप्रेमी, एकांत-प्रिय लोकांना निश्चितच आवडेल.

"आपण राजापूरला पर्यटक म्हणून या,
आपल्याला विविधतेने नटलेले राजापूर निश्चित आवडेल."